मालमत्ता कर शास्ती माफीला प्रतिसाद; दहा दिवसांत महापालिकेकडे ३ कोटी जमा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : थकित मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला थकबाकीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार असून, या योजनेच्या अंमलबजावणीनंतर दहा दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ३ कोटी रुपये जमा झाले आहेत.
गत वर्षी जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तत्कालीन प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी थकित मालमत्ता करावरील शास्ती ९५ टक्के माफ केली होती. त्यानंतर सुमारे ६० हजार थकबाकीदार मालमत्ताधारकांनी ११८ कोटी रुपये एवढा कर भरला होता. या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता, या वर्षीही मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही योजना लागू केली.
२५ हजार नागरिकांनी आकारणीनंतरही भरला नाही टॅक्स. गतवर्षी कराचा भरणा केला, मात्र यावर्षी अद्याप कर भरलेला नाही, असे ४८ हजार ५८६ मालमत्ताधारक ५०० असून, त्यांच्याकडे ११६.०१ कोटी रुपये, तसेच गेल्या चार ते पाच वर्षात नवीन कर आकारणी झालेल्या २५ हजार २९८ मालमत्ताधारकांकडे ६५.८८ कोटी रुपये एवढा कर थकीत आहे. तसेच मागील पाच वर्षात फक्त एकदाच कर भरलेल्या व इतर कर थकीत असलेल्या नागरिकांची संख्या ६८३१ असून, त्यांच्याकडे ४५.३१ कोटी थकबाकी आहे. 
चौकट...............
४०० कोटीचे उद्दिष्ट
आगामी काळात एकूण १.६५ लाख थकबाकीदाराकडून ४०० कोटी करवसूली करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शंभर टक्के शास्ती माफी योजनेचा थकबाकीदार नागरिकांनी लाभ घ्यावा, कर भरणा करून थकबाकीतून मुक्त व्हावे.
- अमोल येडगे, आयुक्त, मनपा.